पुणे- नानाविध प्रकारची फळे, पदार्थ, मिठाई अशा 450 हून अधिक प्रकारच्या मिष्टान्नांचा एक हजार 200 किलो पदार्थांचा अन्नकोट , दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यात आला. .. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल 25 हजार दिव्यांनी सजविण्यात आलेले मंदिर ..मग काय ..त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त बाप्पाचा थाट पाहून , आनंदाने दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने आदी उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला.
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ४५०हून अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात, वृद्धाश्रम, अंधशाळा आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.