पुणे – कोथरुडहून थेट सेनापती बापट मार्गाला जोडला जाणाऱ्या पौड फाटा ते बालभारती दरम्यामच्या प्रस्तावित ३० मीटर रुंद रस्त्याच्या कामाला आता गती येणार असून या कामासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला आणखी वेग येणार आहे. काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची प्रक्रिया तातडीने केली जात असून लवकरच हे काम सुरु होईल, अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासक आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त मालमत्ता व्यवस्थापक राजेंद्र मुठे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, पथ विभाग प्रमुख व्हि.जी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुधीर कदम आणि बिपिन शिंदे उपस्थित होते.
नळ स्टाॅप येथील वाहतूक बहुतांश प्रमाणात सुरूळीत होत असली तरी या भागातील वाहतुकीचा ताण आणखी कमी करण्यासाठी आणि कोथरुडला थेट सेनापती बापट रस्त्याला जोडण्यासाठी पौडफाटा ते बालभारती ३० फूट रुंदीचा रस्ता महत्वाचा ठरणारा आहे. याचाच आढावा माजी महापौर मोहोळ यांनी घेतला.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहराच्या वाहतुकीला आणखी वेग देण्यासाठी विविध उड्डाणपूल आणि रस्त्यांची बांधणी करण्यात येत आहे. त्यात पौड फाटा ते बालभारती हा रस्ताही महत्त्वाचा भाग आहे. सेनापती बापट रस्त्यावरुन कोथरुडला जायचे असल्यास नळस्टाॅपला वळसा घेऊन प्रवास करावा लागतो. उलट प्रवास करतानाही अशीच परिस्थती असते. त्यामुळे या कामाला गती येणे आवश्यक आहे’.
काम सुरु करण्यासाठी सल्लागाची नेमणूक करण्यात आली असून लाॅ काॅलेज, भांडारकर इन्स्टीट्यूट आणि कुमार प्रॉपर्टीज यांच्या मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया विविध पातळ्यांवर सुरु आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो, असेही माजी महापौर मोहोळ म्हणाले.

