पुणे : दिवाळीनिमित्त सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने विशेष पूजा, श्री सुक्त अभिषेक, उत्सवमूर्ती विशेष कलशाभिषेक, ब्रह्म मुहूर्त दर्शन सोहळा यांसह अन्नकोट व देवीला सोन्याची साडी परिधान असे विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली.
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदींनी या कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. दिवाळीच्या काळात होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता कोविडविषयी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, धनत्रयोदशीच्या दिवशी मंगळवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ते ७.३० आणि सकाळी ७.४५ ते ८.४५ दरम्यान मंदिरात विशेष पूजा श्री सुक्त अभिषेक होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी श्री महालक्ष्मी मातेला शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.
याशिवाय पाडव्याच्या निमित्ताने शुक्रवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता ब्रह्म मुहूर्त दर्शन सोहळा होणार आहे. तसेच सकाळी ७.३० वाजता ५६ पदार्थांचा भोग अन्नकोटाच्या माध्यमातून देवीसमोर अर्पण करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये येताना भाविकांनी मास्कचा वापर करावा. तसेच भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटायझेशन या सर्व सोयी मंदिरातर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन दर्शनाची सोय देखील करण्यात आली आहे.