नात्यावर भाष्य करणाऱ्या अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आजवर झाली आहे. कौटुंबिक मूल्यांना अधोरेखित करत हरवलेला संवाद पुन्हा साधणारा ‘स्पंदन–व्हॉट इज रिलेशनशिप’ हा चित्रपट ‘१५ डिसेंबरला’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्रह्मचैतन्य एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मीती शैलेश कुलकर्णी, दत्तात्रय नलावडे आणि फडतरे ग्रुप यांनी तर लेखन–दिग्दर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले आहे. माणसामाणसांतला विसंवाद वाढलाय हे आपण ऐकतो, पाहतो आहोत. त्याचे परिणामही जाणवत असतात. हे लक्षात घेऊनच ‘स्पंदन’ ची कथा सुचल्याचं शैलेश कुलकर्णी सांगतात.
सोशल नेट्वर्किंगच्या वाढलेल्या प्रस्थामुळे आज कुटुंबातील आपसातील संवाद हरवलेला आणि त्यातून नात्यामधील आत्मीयता, ओलावा कमी होत चालला आहे. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून स्पंदनचे कथानक लिहिण्यात आले आहे. नात्यातील विसंवाद, त्यावर काढलेला मार्ग, कधी डोळ्याच्या कडा ओलावणारा तर कधी हास्य फुलवणारा असल्याचे दिग्दर्शक शैलेश कुलकर्णी सांगतात. कुटुंबातल्या प्रत्येकाचा एकमेकांशी असलेल्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवताना तीन पिढ्यांची गोष्ट ‘स्पंदन’ मध्ये दाखवली आहे.
मोहन जोशी, अविनाश नारकर, सागर कारंडे या कलाकारांसोबत प्रसन्न पवार, वैशाली शहा आणि शैलेश कुलकर्णी या नवोदित कलाकारांच्या भूमिका ‘स्पंदन’ चित्रपटात आहेत. पाहुणे कलाकार म्हणून कवी संदीप खरे यांनी विशेष भूमिका केली आहे. या चित्रपटाचे छायांकन प्रशांत सोनावणे, निशांत भागवत, तर संकलन अजित बेर्डे यांचे आहे. सहदिग्दर्शन प्रसाद शिंदे व राज चव्हाण यांनी केले आहे. कास्टिंग स्वाती कडू यांनी केलं आहे. यातील वेगवेगळ्या जॉनरच्या गीतांना सचिन पिळगावकर, बेला शेंडे, जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर व बॉलीवूडचे गायक नीरज श्रीधर व के.के यांचा स्वरसाज लाभला आहे. संतोष खाटमोडे, अनामिक चौहान यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. झी म्युझिकने या चित्रपटातील गीते प्रकाशित केली आहेत.
१५ डिसेंबरला ‘स्पंदन’ प्रदर्शित होणार आहे.