पुणे – उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी पुण्यात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. त्यात वडगाव शेरी मतदारसंघात राजकीय समीकरणांना नवा वळण मिळाला आहे. पक्षाने सुरेंद्र पठारे यांना त्यांच्या पारंपरिक खराडी–वाघोली प्रभाग क्रमांक चारमधून पुन्हा संधी दिली असून विमाननगर–लोहगाव प्रभाग क्रमांक तीनमधून त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.आयटी क्षेत्राचा प्रभाव असलेल्या प्रभागातून थेट आयटी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला संधी देत भाजपने खेळीमेळीची रणनीती आखल्याचे मानले जात आहे. विमाननगर–लोहगाव परिसरात उच्चशिक्षित व आयटी क्षेत्रातील मतदारांचे प्रमाण मोठे असून, गावकी–भावकीचे राजकारणही प्रभावी आहे.

सुरेंद्र पठारे यांना या भागात मोठी लोकप्रियता असली तरी त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक गावकऱ्यांची नाराजी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभागातील सामाजिक संतुलन राखण्यासाठी एका स्थानिक कुटुंबातील महिलेला संधी देण्याचा पर्याय पुढे येत होता. हे टाळत सुरेंद्र पठारे यांनी स्वतः पारंपरिक खराडी–वाघोली प्रभागातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.ऐश्वर्या पठारे यांच्या मैदानात उतरल्यानंतर प्रभाग तीनमधील भाजपचे पॅनल अधिक भक्कम झाल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या या एमआयटीमधून इंजिनिअर असून त्यांनी भारतासह विविध देशांतील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे. आयटी वर्गात त्यांचा चांगला जनसंपर्क असून, स्वतः इंजिनिअर असल्याने सोसायटीधारकांच्या आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या समस्या त्या प्रभावीपणे समजून घेऊ शकतात. गेल्या काही वर्षांत सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या या परिसरात सक्रिय आहेत.याशिवाय, ‘सखी महिला मंचा’च्या माध्यमातून त्यांनी सात हजारांहून अधिक महिलांचे संघटन उभे केले आहे. यापूर्वी बापू पठारे आणि सुरेंद्र पठारे यांच्या निवडणुकांत पडद्यामागील रणनीतीची महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. आता ऐश्वर्या पठारे यांच्या रूपाने उच्चशिक्षित महिला उमेदवार देत भाजपने प्रभाग तीन आणि चार दोन्ही ठिकाणी आपली बाजू सुरक्षित केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

