मुंबई- गुढी पाडव्यानिमित्त ‘आम्ही दादरकर’ आणि ‘वेध फाऊंडेशन’ आयोजित शोभायात्रेत ‘अभंग रिपोस्ट’ या तरुणाईच्या म्युझिकल ग्रुप बँडने आपल्या अनोख्या सुरावटींनी आज उपस्थितांची मने जिंकली. झी टॉकीज चा विशेष सहभाग असलेल्या या शोभायात्रेत वेगवेगळ्या भागातून आलेले असंख्य तरुण वारकरी सहभागी झाले होते. पारंपारिक वेषभूषेतील लहान मुले, मल्लखांब या मराठमोळ्या खेळाचे सादरीकरण, लेझीम पथकाचे सादरीकरण, ढोलताशा पथक, घोडयावरून मिरवणूक अशा वेगवेगळया सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लहानांसह वृद्धांपर्यत सर्वजण या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.गुढीपाडवा… साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधरण महत्त्व आहे. नववर्ष शोभायात्रा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मुंबईत ठिकठिकाणी दिमाखात शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली परंपरा आहे. या शोभायात्रांची शान काही वेगळीच असते. हेच या शोभा यात्रेनेही अधोरेखित केले .


