पुणे- मूक चित्रपटांपासून बोलपटांपर्यंतचा इतिहास… विसाव्या दशकापासून ते पन्नासाव्या दशकापर्यंत भारतीय
चित्रपटांमध्ये झालेली स्थित्यंतरे…..संगीतकारांची काम करण्याची पद्धत व स्वभाव वैशिष्ट्ये….आणि या सर्व काळातील
गाजलेल्या गाण्यांच्या चित्रफितीच्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणाने रसिकांना तृप्त केले. निमित्त होते ‘सुन जा दिल
की दास्ता’…सिने संगीत एक परीकथा या दृकश्राव्य कार्यक्रमाचे.
पूना गेस्ट हाऊस, सिने गप्पा आणि सिनेमंच यांच्या वतीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालायामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या संयोजिका सुलभा तेरणीकर यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
त्यांनी हिंदी चित्रपटाच्या युगाचा पट उलगडत जुन्या आठवनींना उजाळा दिला. आठवणींबरोबरच या संगीतकारांच्या
त्या काळातील गाण्यांचे चित्रफितीद्वारे केलेल्या सादरीकरणाने रसिकांचे कान व डोळे तृप्त झाले. उस्मान शेख व वंदना
कुलकर्णी यांनी त्यांना साथ दिली. हा कार्यक्रम संगीतकार सज्जाद हुसेन यांना समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाच्या
सुरुवातीला सुलभा तेरणीकर यांच्या हस्ते अनिल भोळे, अनिल दामले आणि किशोर सरपोतदार यांचा सत्कार करण्यात
आल्या.
सुलभा तेरणीकर म्हणाल्या, नानासाहेब सरपोतदार हे स्टुडिओचे मालक तर होतेच परंतु ते लेखक, दिग्दर्शक व
संगीतकारही होते. कलावंतांची हलाखीची स्थिती बघून त्यांनी पूना गेस्ट हाऊस सुरु केले असे त्यांनी सांगितले. केशवराव
भोळे हे सिनेमा संगीताचे आद्य प्रवर्तक होते असे गौरोद्गार त्यांनी काढले.
सज्जाद हुसेन हे उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांच्या चाली या अभिजात असायच्या. त्यांनी कलाकारांना टाळले मात्र,
आपल्या प्रतिभेशी कोणाला ढवळा ढवळ करू दिली नाही.त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्या हा कार्यक्रम समर्पित
करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दादासाहेब फाळकेंनी मुक चित्रपटाद्वारे एक नवीन दालन कलाकारांना उपलब्ध करून दिले. २० व्या दशकात सामाजिक,
पौराणिक चित्रपटांमुळे संगीत रंगभूमी हळूहळू संपली. मूकपट हे सर्व भारतीयांना एकत्र आणणारी गोष्ट होती मात्र
बोलपट सुरु झाल्यावर भाषेमुळे पुन्हा वेगळे झाले असे सांगून तेरणीकर म्हणाल्या, प्रादेशिक अस्मिता वेगळी झाली तरी
हिंदी भाषेने एकतेची ओळख करून दिली. पार्श्वसंगीत बोलपंटामध्ये आले आणि संगीत रंगभूमीवरील लोक सिनेमात
आले. सिनेमामध्ये पार्श्वगायनाचा प्रयोग झाला आणि तो एक इतिहास झाला.
त्या म्हणाल्या, ३० व्या दशकापर्यंत स्थिर चित्रण आणि शांत गाणी होती मात्र १९४१ ला सिनेमाची परिभाषा बदलत
गेली. त्यानंतर पंजाबी ठेका आला. गुलाम हैदर यांनी इतिहास घडविला. त्यानंतर संगीतकाराला प्रतिष्ठा मिळू लागली.
१९४७ ला देशात स्थित्यंतरे घडली फाळणीच्या ज्वाळा या सिनेक्षेत्राला लागल्या त्यामुळे नूरजहाँ, सैगल, गुलाम हैदर हे
निघून गेले. हिंदी चित्रपटात नवनिर्मिती घडली दिलीप कुमार, देवानंद व राजकपूर आले आणि लता मंगेशकर यांच्या
रूपाने मोठी देणगी मिळाली असे त्यांनी सांगितले.
दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रत्येक गाण्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

