पुणे: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला यावर अजुनही बहुसंख्य भारतीयांचा विश्वास नाही. कारण त्या विमान कथित अपघाताच्या ज्या बातम्या प्रसृत झाल्या आहेत त्याच संशयाचे धुके निर्माण करतात. नेताजी त्या विमान अपघातात मरण पावले नसून ते सुरक्षितपणे सटकून अन्यत्र कोठेतरी गेले असावेत हे गृहित धरून त्या दिशेने अनेक संशोधकांनी शोधमोहिम राबवली आहे. त्यात मिशन नेताजीचे अनुज धर हे विख्यात पत्रकार व लेखक आघाडीवर आहेत. त्यांचे पुण्यामधे नेताजींच्या मृत्युच्या रहस्यावर शनिवार दि. २३ सप्टेंबर १७ रोजी सकाळी दहा वाजता रेंजहिल येथील सिम्बॉयोसिस इंस्टिट्युटच्या सभागृहात मिशन नेताजी तर्फे श्री. लोकनाथ राव यांनी व्याख्यान आयोजित केले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या या रहस्यमयी मृत्युबाबत श्री. धर यांचे संशोधन ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची पुणेकरांसाठी ही मोठी संधी आहे.
अनुज धर यांनी या विषयाला वाहिलेले अनेक पुस्तकेही लिहिली असून त्यावर वादळी चर्चा होत असते. नेताजींबद्दलच्या गोपनीय फाइल्स खुल्या करण्याचे काम सरकारने सुरु केले त्यात अनुज धर यांचा मोठा वाटा होता. फैजाबाद येथे १९८५ साली मरण पावलेले गुमनामी बाबा भगवानजी म्हणजेच नेताजी असून १४ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर १९४५ या काळात मात्सुयामा विमानतळावर कोणताही विमान अपघात झाला नसल्याचे माहिती तैवान सरकारने श्री. धर यांना दिली होती. यामुले त्यांच्या दाव्यांना बळ मिळते. या व्याख्यानाद्वारे यामागील सर्व रहस्य उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे या व्याख्यानाचे आयोजक लोकनाथ राव यांनी सांगितले. या अभ्यासपुर्ण व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक पुणेकरांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.