नवी दिल्ली: गेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याचा निर्णय घेतला असून पहिले महत्वाचे पाऊल म्हणून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पराभवावर विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर आज पराभव झालेल्या ५ राज्यांमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेत सोनिया गांधी यांनी आक्रमकपणे परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.