पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मागील आठवडयात महापालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उद्या ( शुक्रवारी) महापालिकेत सोमय्या यांचा ज्या ठिकाणी ही घटना झाली त्याच ठिकाणी सत्कार करणार असल्याचे वृत्त पसरले आहे.या कार्यक्रमास शहर कॉंग्रेसने विरोध केला असून या कार्यक्रमास महापालिकेने परवानगी दिल्यास त्याच ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.गुरूवारी शहर कॉंग्रेसच्या वतीने गुरूवारी महापालिके समोर आंदोलन केले असता कार्यकर्त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यावेळी नागरिकांना आणि खुद्द नगरसेवकांना ही मज्जाव करत त्रास देण्यात आला. त्यामुळे सोमय्यांच्या सत्कारास परवानगी देऊ नये अशी मागणी बागवे यांनी केली आहे.या पत्रानुसार, शहराच्या परंपरेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त जनतेच्या हिताचे उपक्रम आणि महानगरपालिकेच्या कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाते. जर पालिका प्रशासनाने भारतीय जनता पक्षाला माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर त्या ठिकाणी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
सुट्टीच्या दिवशी कोणालाही न भेटणारे आयुक्त महापालिकेत कोणी नसताना सोमैय्यांना भेटीसाठी वेळ कसा काय देतात ? तिथे कोणी पदाधिकारी, कोणत्याही पक्षाचे नगरसेवक ,अधिकारी नसताना काही वादग्रस्त घटना घडतात यास आयुक्तांना जबाबदार का धरू नये ? असे सवालही उपस्थित करण्यात आले आहेत .