भाजपकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर 26 तारखेला दापोलीत जाऊ या, अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या सातत्याने अनिल परबांवर आरोप करत आहेत.
दापोली प्रकरणातील ट्विटपूर्वी सोमय्या यांनी आणखी एक ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले होते. यात अनिल परब यांच्या, रिसॉर्टच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये रोख स्वरूपात खर्च झाल्याचे आयकर विभाग सांगत आहेत, ही रोख रक्कम कुठून आली? ही वसुली वाझेंची होती की खरमाटेची?,” असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारले आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब यांचे हे रिसॉर्ट बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. दरम्यान, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर किरीट सोमय्यांचा रोख अनिल परब यांच्याकडे असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या ट्विटला अनिल परबांकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर 26 मार्चला ते खरंच परबांचे रिसॉर्ट तोडणार का, हे बघणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

