भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आयएनएस विक्रांत बचावसाठी जमवलेल्या निधीप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुनच पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावले आहे. आज सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या तरी सोमय्या पिता-पुत्र नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आज अकरा वाजता सोमय्या चौकशीसाठी हजर राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर सोमय्यांची चौकशी होणार आहे.आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी केलेल्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले होते, ते पैसे सोमय्या यांनी राजभवनात जमाही केले नाहीत असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना आज पोलिसांनी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
पण ही एफआयआर ऐकीव माहितीच्या आधारावर असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे,मुंबई पोलिसांनी दाखल केलेला माझ्याविरोधातील एफआयआर हा हास्यास्पद असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे ही तक्रार नोंदवली. त्यामध्ये कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी माझ्यावरील गुन्हा सिद्ध करावा असे आव्हान त्यांनी दिले.

