रस्ते बांधणी तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. विजय जोशी यांचे मत – विद्या महामंडळ पुणे पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : जेव्हा ऑस्ट्रेलियातील सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेचे काम मला मिळाले तेव्हा तिथे देखील जुन्या पद्धती प्रमाणेच काम केले जात होते. परंतु जेव्हा मी स्टिल उत्पादनादरम्यान तयार होणारी मळी रस्ते बांधण्यात कशी वापरता येईल हा विषय मांडला तेव्हा त्यांनी मला संधी दिली. आज आपल्या देशात देखील अनेक ठिकाणी चांगले रस्ते होत आहेत. जर समाजभान राखून विचार केला तर वेस्ट प्रोडक्टपासून देखील देशात टिकाऊ आणि खड्डे विरहित रस्ते होऊ शकतात, असे मत रस्ते बांधणी तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केले.
डेक्कन येथील विद्या महामंडळ संस्थेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त लोकशिक्षण दिन साजरा केला जातो. यावेळी आपटे प्रशालेच्यावतीने पु.ग.वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना पु.ग.वैद्य स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभय आपटे, कार्याध्यक्ष डॉ.अ.ल. देशमुख, कार्यवाह गीता देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह, अकरा हजाराचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. विजय जोशी म्हणाले, आज देशात रस्ते बांधणी सल्लागार म्हणून मी काम करीत आहेच. परंतु त्याचे मूल्य कधीच घेतले नाही. किती ही पैसे कमावले तरी देखील शेवटी तुम्ही किती यशस्वी झालात हे महत्वाचे असते, असे ही त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अक्षय शिंदे म्हणाले, मी सामान्य कुटुंबातील असलो तरी उच्च ध्येय आणि समाजभानाचे संस्कार मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले आणि ते जोपासण्याचे संस्कार प्रशाले कडून मिळाले. जर मी या प्रशालेत आलो नसतो तर मी आज या पदाला देखील पोहचू शकलो नसतो. पोलीस म्हणून काम करीत असताना अनेक नकारात्मक गोष्टींना सतत सामोरे जावे लागत असते. परंतु अशा सत्कारांमधून सकारात्मक उर्जा मिळत असते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. अ.ल. देशमुख म्हणाले, पु.ग.वैद्य सरांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार शाळेतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना दिला जातो. डॉ. अक्षय शिंदे सारख्या विद्यार्थांकडे पाहून वैद्य सरांनी दिलेली शिकवण या विद्यार्थांमध्ये रुजलेली दिसते, असे ही त्यांनी सांगितले.

