पुणे- बीआरटी चे काय झाले आपण पाहिले , आता चक्क मेट्रो ने पुण्यातील वाहतूकसमस्या सुटेल असा साक्षात्कार साऱ्यांना झाला आहे. बीआरटी येण्यापूर्वीही असाच साक्षात्कार झाला होता . याच बीआरटीने पुण्याच्या वाहतुकीचा बट्ट्याबोळ करीत कलमाडींचे पुणे महापालिकेतील वर्चस्व हिरावून घेतले. हा इतिहास असताना आता पुणे महापलिका निवडणुकीच्या तोंडावर पुणेकरांना ‘मेट्रो ‘ चे गाजर..दाखविण्यात येते आहे . आणि मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी देखील मोठी चुरस लागली आहे .
दिल्लीत पीआयबी ने मेट्रोची शिफारस केंद्र सरकारच्या कॅबिनेट कडे केल्याने पुणे महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बिडकर आणि भाजपचे नगरसेवक यांनी आज महापालिकेत पेढे वाटत सुटले तर महापालिकेची आगामी निवडणुक लक्षात ठेवून भाजपने पुणे मेट्रोला मंजुरी दिली आहे. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यातील मतभेदांमुळे पुणे मेट्रोला उशीर झाला अशी टीका पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला असून याचा बोजा सर्व सामान्य नागरिकांवर पडणार असल्याचेही ते म्हणाले.जगताप म्हणाले की ,महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राज्य आणि केंद्रातील भाजपने पुणे मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र हा प्रश्न गेल्या अडीचवर्षापासून मार्गी लावता आला नाही. त्यामुळे प्रत्येक दिवसाला 2 कोटी याप्रमाणे 1500 कोटी रुपयांचा भुर्दंड पुणेकरांच्या करातून वसूल केला जाणार आहे. येत्या 15 दिवसांत पुणे मेट्रोचा विषय कॅबिनेट मंत्र्यांपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. मात्र या मंजुरीनंतर पालकमंत्री आणि खासदारांमध्ये कोणतेही मतभेद होता कामा नये. अन्यथा पुन्हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मोठा गाजावाजा करीत उद्घाटन केले. सद्य स्थितीला कोणताही प्रकल्प सुरु नाही. यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पासारखी मेट्रोची अवस्था होता कामा नये असेही ते म्हणाले.