पुणे- ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…सागरा प्राण तळमळला’ यातून मातृभूमीविषयीचे प्रेम व्यक्त करणार्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोमवारी फर्ग्युसन महाविद्यालयात तरूण-तरूणींनी गर्दी केली होती.
सावरकरांच्या वास्तत्याने पावन झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. या ठिकणी त्यांचे जीवनकार्य उलगडणारी एक भिंत तयार करण्यात आली होती. त्यातून सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना चित्ररूपी उजाळा देण्यात आला.
सावरकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी सावरकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संचालक महेशे आठवले, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, वसतिगृह प्रमुख प्रा. श्रीधर व्हनकटे, प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. किशोर सोनवणे, डॉ. सविता केळकर, सावरकरांचे अभ्यासक श्री. म. जोशी, पंडित वसंतराव गाडगीळ या वेळी उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे यांनी भेट देऊन आदरांजली अर्पण केली.
सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची आठवन करून देणारी चित्रेही येथे पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. नागरिक व विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि त्यांचे जीवनकार्य जाणून घेतले.
सावरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असाताना १९०२ ते १९०५ या कालावधीत वसतिगृह क्रमांक एकमधील खोली क्रमांक १७ मध्ये ते राहत होते. त्यांनी वापरलेला पलंग, वकिली करत असताना परिधान केलेले गाऊन, सावरकरांची साहित्य संपदा या ठिकाणी ठेवण्यात आली होती.

