पुणे – प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला एकात्मतेचा संदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगा एकता रॅली या दुचाकी फेर्यांचे आयोजन करण्यात आले होते.
भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय संविधानाचा विजय असो, हम सब एक है अशा घोषणा देत, दुचाकीवर तिरंगा फडकावीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले.
पालकमंत्री गिरीश बापट व शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदीर ते ओमकारेश्वर मंदीर या मार्गावर दुचाकी फेरी काढण्यात आली.
विविधतेतून एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविधतेतून नटलेल्या या देशात एकता व अखंडता राखण्यासाठी कटिबध्द होण्याचे आवाहन श्री. बापट यांनी यावेळी केले.
एकात्मता व अखंडतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश भाजपच्या वतीने तिरंगा एकता रॅलीचे आयोजन केले असल्याची माहिती शहराध्यक्ष गोगावले यांनी यावेळी दिली. शहरातील सर्व मतदारसंघांमध्ये पाच हजारहून अधिक दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णा भाऊ साठे स्मारक स्वारगेट ते स्वारगेट या मार्गावर पर्वती मतदारसंघाच्या रॅलीचे नेतृत्व आमदार माधुरी मिसाळ, सरचिटणीस दीपक मिसाळ यांनी केले. आमदार मिसाळ यांनी एकात्मतेची शपथ दिली. महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. अध्यक्ष हरिष परदेशी यांनी संयोजन केले.
बावधन पोलीस चौकी ते बालाजीनगर धनकवडी या मार्गावर आमदार भीमराव तापकीर यांनी नेतृत्व केले. सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुण राजवाडे यांनी संयोजन केले. शिवाजीनगर मतदारसंघाचीफेरी फर्ग्युसन महाविद्यालयापासून आमदार विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होते. अध्यक्ष सतिश बहिरट यांनी संयोजन केले. हडपसर मतदारसंघातील फेरी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. अध्यक्ष सुभाष जंगले यांनी संयोजन केले.





