पुणे – अपंग व्यक्तिंच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी वेबपोर्टल आणि विविध सामाजिक संस्थांना देणगी देऊन सरस्वती विद्यामंदिराचे कार्यवाह आणि शहर भाजपचे कोषाध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर यांनी आपला साठावा वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात कार्यरत असणार्या प्रा. आंबेकर यांनी अपंगांच्या कौशल्य प्रशिक्षणाचे वेबपोर्टल करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे. या वेबपोर्टलच्या सहाय्याने अपंग विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, नोकरी व रोजगारासाठी मार्गदर्शन मिळू शकेल.
याबरोबर सार्थक सेवा संघ, शंभूराजे प्रतिष्ठान, निवारा वृध्दाश्रम, अनाथाश्रम, मूकबधिर शाळा, अपंग वसतिगृह, स्वरूपवर्धिनी, सरस्वती मंदीर आदी बारा सामाजिक संस्थांना प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे साठ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करुन व्यक्तिगत आनंदात समाजातील उपेक्षितांना सहभागी करुन घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उपक्रम राबविल्याचे प्रा. आंबेकर यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्सवरील अनावश्यक खर्च टाळून समाजातील उपेक्षितांसाठी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे असे आवाहनही प्रा. आंबेकर यांनी केले आहे.