पुणे, ता. 20 :- तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे माणसाचा रोजगार जाण्याची शक्यता असते. माणसाला लागणार्या कामाचे स्वरूप बदलले. पर्यायाने नोकर्यांची संख्या कमी होत आहे. युवकांना रोजगार देण्याचे आव्हान सरकार समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणात उद्योजकता विकास घडवून आणण्याची गरज असल्याचे मत ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चे माजी महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी व्यक्त केल
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘मा. स. गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय’ आणि ‘डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे उद्घाटन करताना सरदेशमुख बोलत होते. डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. ज्ञानप्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक, ‘डीईएस’चे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रबंधक डॉ. सविता केळकर, ‘जेआरव्हीजीटीआय’चे संचालक प्रशांत गोखले, मुख्याध्यापिका लीना तलाठी, ज्योती बोधे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण उपयोगाचे नाही, तर पुस्तकापेक्षा वेगळा विचार केला पाहिजे. काहीतरी करून दाखविणारी माणसे घडविण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात शालेय स्तरावरील कौशल्य विकास अभ्यासक्रमात असल्याचे मत डॉ. नाईक यांनी व्यक्त केले.
कुंटे म्हणाले, ‘डीईएसमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील अशा प्रकारची रचना करण्यात येत आहे. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये तंत्रशिक्षण कौशल्याचे दोन किंवा तीन विषय शिकविले जाणार आहेत. त्यासाठी ‘जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडेन्स अॅण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूट’चे सहकार्य घेण्यात येत आहे.’
लीना तलाठी यांनी प्रास्ताविक, ज्योती बोधे यांनी परिचय, अक्षय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि वासंती बनकर यांनी आभार प्रदर्शन केले.
उद्योजकता विकास घडवून आणण्याची गरज अनंत सरदेशमुख
Date:

