भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
पुणे, ता. ४ – चीनमधून संपूर्ण जगात वेगाने पसरत असलेल्या कोरोना रोगाला वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून ससून सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
मुळीक यांनी ससूनचे उपअधिष्ठाता राजेश कार्यकर्ते यांची आज भेट घेऊन कोरोनाबाबत करीत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. डॉ. अजय तावरे, जयप्रकाश पुरोहित, एस. आर. मिश्रा यावेळी उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, ‘महापालिकेचे नायडू रुग्णालय आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयांत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयात पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्ह्याच्या ग‘ामीण भागात अद्याप एकाही कक्षाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कक्षांवर ताण येऊ नये म्हणून ससून रुग्णालयात तातडीने स्वतंत्र कक्ष निर्माण करावा.’
संशयितांवर उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष, आवश्यकतेनुसार अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, नमुना तपासणीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा, प्राथमिक औषधोपचार, जनजागृतीसाठी माहितीपत्रके आणि भित्तीपत्रके आणि आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात आदी मागण्या मुळीक यांनी निवेदनात केल्या आहेत.

