पुणे –समाजातील वंचित आणि गरजुंच्या सामाजिक समस्या बऱ्याच आहेत त्या सोडवण्यावर लक्ष देत असताना अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी अशी अपेक्षा पद्मश्री डॉ सुदाम काटे यांनी व्यक्त केली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नूतन वास्तूचे उदघाटन डॉ काटे यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे ,कार्यवाह श्रीकृष्ण कानिटकर,नियामक मंडळ उपाध्यक्ष महेश आठवले, शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे, खेमराज रणपिसे , प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष नितीन आपटे,आदी व्यासपीठावर उपस्थित होते. नूतन वास्तूच्या उभारणीत महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या व्यक्तीचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आपण स्वतः गेली अनेक वर्षे आदिवासी क्षेत्रात काम करीत आहोत, असे नमूद करून ते म्हणाले, आदिवासी समाजात अनेकविध प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमजुती आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या आहेत. काही बाबी त्यांना पटू लागल्या आहेत. विशेषतः सातपुड्याच्या पट्ट्यातील आदिवासी भागात सिकल सेल हा आजार आढळून आला आहे. तो दूर करण्यासाठी प्रयन्त सुरु आहेत. त्याला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असून गरजू रुग्णांना त्याची उपलब्धी झाली तर त्याचा जीव वाचणे शक्य आहे. असे ते म्हणाले.
या संस्थेशी माझा लहानपणापासूनच ऋणानुबंध आहे. असे नमूद करून ते म्हणाले , या संस्थेच्या शाळेत केवळ शिक्षण झाले नाही तर मनावर चांगले संस्कार झाले त्याचा जीवनात नक्कीच उपयोग झाला आहे. यावेळी त्यांनी शाळेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी श्री कुंटे यांनी मनोगत व्यक्त केले

