पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी पियुष महाराष्ट्रात पाचव्या तर देशात ६३ व्या स्थानावर आहे. त्याची आय.ए.एस.च्या केडरसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशानिमित्त त्याचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांशी संवाद याचे सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांशी संवाद याचे आयोजन महाविद्यालयाच्या कुंदनमल फीरोदिया सभागृहात करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. नितिन कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री नवलमल फीरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांनी प्रास्ताविक केले. अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाची जोड दिल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये यश नक्की मिळेल असा सल्ला सत्कारार्थी पियूष ने उपस्थित विद्यार्थ्यांना दिला प्रशासकीय कार्यालये सामान्य लोकांसाठी अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी मी काम करेन असे पियुष ने नमूद केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्याने मनमोकळेपणे उत्तरे दिली.
या सत्कार समारंभासाठी पियुषचे वडिल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. भगवानराव साळुंखे, आई सौ. शशिकला साळुंखे उपस्थित होते. पियुषच्या यशासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विकास काकतकर यांनी त्याचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थीनी भक्ती मुथा हिने सुत्रसंचालन केले.