पुणे- कोंढवा बुद्रुक येथे तालाब मशिदीसमोर असलेल्या गगन अव्हेन्यू इमारतीतील बेक्स अँड केक्स बेकरीमध्ये आज (शुक्रवार) पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. बेकरीला बाहेरून कुलूप असल्याने आतील सर्व कामगारांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान या आगीप्रकरणी बेकरी मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
हे कामगार काल रात्री बेकरीमध्येच झोपले होते. बेकरीला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे आग लागल्यानंतर कामगार बेकरीतच अडकून पडले. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत बेकरी जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये इर्शाद खान (वय 26), शानू अन्सारी (22), झाकीर अन्सारी (24), फहीम अन्सारी (21), जुनैद अन्सारी (25), झिशान अन्सारी (21) यांचा मृत्यु झाला. हे सर्व मूळचे उत्तर प्रदेशचे होते.
याप्रकरणी बेकरीचे मालक अब्दुल्ला मोहम्मद युसुफ चीनिवार,मोहम्मद तायेब शाहीद अन्सारी ,मोहम्मद मुनीर दावूद चीनीवार या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत .


