पुणे-जितेंद्र भुरुक यांनी गायलेली गाणी मी ऐकली आहे आणि त्यांचा आवाज किती अद्भूत आहे हे त्यावेळी लक्षात आले. एक करिश्मा किशोर कुमार होते आणि एक करिश्मा जितेंद्र भुरुक आहेत. त्यांच्या सादरीकरणात जादू असते. त्यांचे नशीब किशोर कुमारांसारखे नसले तरीही आवाज त्यांच्यासारखा आहे. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. प्रगतीच्या दिशेने हा प्रवास असाच पुढे जात राहो, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी व्यक्त केली. गायक जितेंद्र भुरुक यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. गायक किशोर कुमार यांची ८९ गाणी सलग ११ तास गाऊन आणि एकाच दिवशी ५ वेगवेगळ्या थिएटरमध्ये १३५ गाणी सादर करून विश्वविक्रम केल्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी (१ मे) झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार इनोक डॅनिअल, अभिनेता स्वप्नील जोशी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी उपमहापौर दीपक मानकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, गिनीज फाउंडेशनचे अध्यक्ष पवन सोळंकी, तबलावादक पद्मश्री सुरेश तळवलकर, अभिनेता प्रवीण तरडे, समाजसेविका शोभा धारीवाल, मनिष साबडे आदी यावेळी उपस्थित होते. भुरुक यांना ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’तर्फे यावेळी मानपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले व सत्कार समितीतर्फे शिंदेशाही पगडी आणि शेला देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जनरल पोस्ट ऑफिसतर्फे जिंतेद्र भुरुक यांच्या नावे पोस्ट तिकीट काढण्यात आले असून त्याचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. गिनीज फाउंडेशनचे सोळंकी या रेकॉर्डबद्दल माहिती देताना म्हणाले, आतापर्यंत आमच्याकडे तीन हजारांहून अधिक रेकॉर्डची नोंद झालेली आहे. मात्र लाइव्ह बँडसह गाण्यांचा रेकॉर्ड करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. या प्रयोगाबद्दल एकून आम्ही आधी चक्रावलो. परंतु, जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा आम्हा सगळ्यांना आनंद झाला. पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणाले, कलेतून भावनांपर्यंत पोहोचता येते. कला ही प्रत्येकाच्या मनावर राज्य करते आणि जितेंद्र भुरुक आपल्या कलेतून हेच काम करीत आहे. आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र भुरुक म्हणाले, गाणे हा माझा श्वास आहे. किशोरदांची गाणी न गाता जगणे माझ्यासाठी कठीण आहे. या रेकॉर्डसाठी माझे सहकारी, मित्र, वाद्यवृंद, आर्टिस्ट या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांचामुळेच हे शक्य झाले. त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. या सोहळ्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे आणि यापुढे काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मानकर यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सत्कार सोहळ्यानंतर जितेंद्र भुरुक यांच्या ‘गीत गाता हूँ मैं’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.