नवी दिल्ली – आयकर विभागाने बुधवारी देशभरात 100 ठिकाणी धडाधड छापे टाकले आहेत. राजकीय फंडिंगशी संबंधित एका प्रकरणात हे छापे टाकण्यात येत असल्याची माहिती आहे. मिड डे मिल घोटाळा प्रकरणी मुंबईतही आयकरचे छापे सुरू आहेत. येथे आयटी पथके 4-5 ठिकाणी छापे टाकत आहेत. आयकर विभागाला काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रासोबतच राजस्थान, दिल्ली, उत्तराखंडमध्येही छापेमारी सुरू आहे. करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.
अशोक गेहलोत सरकारमध्ये गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्याशी संबंधित ठिकाणावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण कारखाना आहे. आतापर्यंत तब्बल 53 टीम याठिकाणी पोहोचल्या आहेत. या छाप्यात 300 हून अधिक पोलिसांचा सहभाग आहे तर 100 वाहनांचा वापर करण्यात आला आहे. जयपूर जिल्ह्यातील कोतपुतली येथेही छापे टाकण्यात आले आहेत. आयटी अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनाही सोबत घेतले आहे.
बंगळुरूमध्येही आयटी छाप्यांची माहिती समोर आली आहे. मणिपाल ग्रुपवरही आयटीने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमध्ये 20 हून अधिक ठिकाणी आयटीचा शोध सुरू आहे. सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत.