पुणे-दुबईतील लिंक वायर्स लि. कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रुती गोखले यांना दुबईत नुकत्याच झालेल्या विश्व मराठी संमेलनात ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ दुबईमध्ये मिलिटरी ग्रेड फेन्सिंग वायर्सचे उत्पादन करणार्या या कंपनीचा कारभार आता 75 हून अधिक देशांमध्ये विस्तारित झाला आहे. देशांच्या सीमा अथवा महत्त्वाची विमानतळासारखी केंद्रे यांना संरक्षण म्हणून त्यांच्या फेन्सिंग वायर्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी या कंपनीत सध्या काम करीत असून, दुबईमध्ये कंत्राटी कामगारांना रोजगार देणारी दुबईतील ही तिसर्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. दुबईत विश्व मराठी संमेलनाच्या झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
मूळच्या पुण्याच्या असणार्या श्रुती गोखले या विवाहानंतर मस्कत येथे गेल्या. पुढे सिव्हिलको इलेक्ट्रो मेकॅनिकल या कंपनीत आर्थिक विभागात कंपनीचे मालक यू. एम. किणी यांच्या समवेत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. अंगभूत गुणांमुळे काही काळातच त्या व्यवस्थापन भागीदार झाल्या. 1990 मध्ये अवघ्या 15 कामगारांसह सुरू झालेली ही कंपनी आता दोन हजार कामगार एवढी विस्तारली आहे. त्यांची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
या गौरव समारंभानिमित्त दुबईतील आखाती पर्यटन महोत्सवाचे संचालक अवध मोहम्मद बिन शेख मुजरेन यांनी याप्रसंगी विशेष संदेश पाठवून म्हटले की, ‘महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून स्थलांतरित झालेल्या भारतीयांचा आखाती देशांच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे.’
श्रुती गोखले यांना नृत्य आणि अंतर्गत सजावट याची आवड असून, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या महाराष्ट्रात शिरवळ व तमिळनाडू येथे सामाजिक संस्था चालवत आहेत. तसेच अनेक समाजोपयोगी प्रकल्पांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. श्रुती गोखले यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल दुबईतील मराठी बांधवांनी आनंद व्यक्त केला.

