पुणे : ज्ञानाची शक्ती ही देशातील सर्वात मोठी शक्ती आहे. इनोव्हेशन, सायन्स, टेक्नॉलीजी याला आपण ज्ञान म्हणतो. कन्व्हर्जन आॅफ क्नॉलेज इंटो वेल्थ हे आपल्या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे भारत देश हा जगातील नंवर एकची क्नॉलेज पॉवर होवो, अशी प्रार्थना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गणेशचरणी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १२७ व्या वर्षानिमित्त ॅगणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या श्री गणेश सूर्यमंदिर सजावटीचे व मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार गिरीष बापट, भाजपा पुणे शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
यंदाची सजावट असलेले श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले असून अत्याधुनिक लाईटने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२५ झुंबर लावण्यात आले आहेत.
नितीन गडकरी म्हणाले, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. माझे वडिल माधवनाथ महाराज यांचे शिष्य होते आणि दगडूशेठ हे त्यांचे शिष्य होते, त्यामुळे मी दगडूशेठ गणपती व दत्तमंदिराचा इतिहास ऐकलेला आहे. आपण सगळेजण गणपतीला विद्येचे दैवत मानतो आणि विद्या ही समाजाला अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गणरायाचे पूजन करीत आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
* यंदाची सजावट असलेल्या श्री गणेश सूर्यमंदिराचे वैशिष्टय
यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले आहे.
सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र आहेत. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रीं ची मूर्ती विराजमान झाली आहे.
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देखील गडकरींनी घेतले दर्शन
नितीन गडकरी त्यांनी त्यांच्या घरातच दगडूशेठ गणपती व दत्तमंदिराचा इतिहास ऐकलेला आहे. त्यामुळे त्यांनी दगडूशेठ गणपती च्या सजावटीचे उद््घाटन केल्यानंतर कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देखील दत्तमहाराजांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्य गाभा-याच्या मागे असलेली लक्ष्मीबाईंची व इतर तैलचित्रे त्यांनी आवर्जून पाहिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार आणि कार्यकारी विश्वस्त युवराज गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.
भारत देश हा जगातील नंबर एकचा नॉलेज पॉवर देश होवो-नितीन गडकरी-
Date: