पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे व सदानंद शेट्टी यांच्यासह वानवडी भागातील प्रफुल्ल जांभुळकर व केव्हिन मॅन्युअल यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांची उपस्थिती होती.
पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. पुणे शहराचा विकास कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले अजितदादाच करू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू,’ अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशासमयी दिली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून, या पक्षप्रवेशाने निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कॉंग्रेसचे अभ्यासू नगरसेवक असा लौकिक आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत शिरोळे यांनी प्राप्त केला होता तर मुळचे जनता पक्षातून कॉंग्रेस मध्ये गाडगीळ गटात आलेल्या राम कांबळे आणि समुहात सदानंद शेट्टी देखील कॉंग्रेस वासी झाले होते कॉंग्रेस मध्ये असताना या दोहोंना स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला मिळाली . या काळात त्यांनी चांगली लोकोपयोगी कामे करून लौकिक मिविला होता. त्यानंतर शेट्टी यांनी शिवसेना ,पुन्हा कॉंग्रेस आणि त्यानंतर भाजपा आणि आता राष्ट्रवादी त प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी सुजाता शेट्टी या कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत .

