पुणे : केवळ गणेशोत्सव व नवरात्रीच नाही, तर वर्षभर समाज शांतपणे झोपावा, याकरिता पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स आणि अग्निशमन दलातील जीवरक्षक काम करीत असतात. केवळ आग विझविणे हेच त्यांचे काम नसून इतरही अनेक संकटांमध्ये ते समाजासाठी कार्यरत असतात. सिमेवर ज्याप्रमाणे सैनिक कार्यरत असतात, त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत सुरक्षेचे महत्वाचे काम अग्निशमन दल करते, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टतर्फे बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या सभागृहात जनतेला सेवा देणा-या अग्निशमन दल अधिकारी व जीवरक्षकांचा कृतज्ञता गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापालिका उपायुक्त माधव जगताप, हेमंत रासने, पराग ठाकूर, महेश सूर्यवंशी, ॠग्वेद निरगुडकर, प्रसाद कुलकर्णी, विवेक खटावकर, अनिल सकपाळ, पुनीत बालन, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे, राजेश दातार, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित, गणेश रामलिंग, मोहन साखरिया, किरण चौहान, साई डोंगरे आदी उपस्थित होते.
अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांसह जीवरक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच श्री तुळशीबाग गणपती मंडळात वर्षभर सेवा देणा-यांना देखील गौरविण्यात आले. श्रीं ची प्रतिमा, महावस्त्र व श्रीफळ असे सन्मानाचे स्वरुप होते. मागील १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जातो.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोठेही दुर्घटना होवू नये व झाल्यास त्याचे त्वरीत निराकारण व्हावे, याकरिता महत्वाची भूमिका अग्निशमन दल बजावते. त्यांच्या कार्याचा सन्मान आपण करणे गरजेचे आहे. तसेच त्यांंन अद्ययावत साधने देखील पुरविणे आवश्यक आहे. अग्निशमन दलासह पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि समाजासाठी कार्य करणा-या व्यक्ती व कुटुंबांकरिता कायमस्वरुपी काम उभे रहायला हवे. तसेच प्रत्येक व्यक्तिला नैसर्गिक किंवा मानवनिर्मीत संकटांना सामना करण्याचे प्राथमिक शिक्षण येणे, ही आजची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
पुण्याचे दु:ख संपविण्याची ताकद गणेश मंडळांमध्ये – चंद्रकांत पाटील
गणेश मंडळांकडे समाजाकडून येणारा पैसा मोठया प्रमाणात गोळा होतो. त्यामाध्यमातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्य देखील सुरु असते. मात्र, या पैशाची साठवणूक व बचत न करता, हा सगळा पैसा समाजासाठी खर्च करायला हवा. चांगल्या कार्यासाठी पैसा खर्च झाल्यास समाजाकडून सातत्याने निधी गोळा होत असतो. समाजासाठी खर्च करुन पुण्याचे सर्व प्रकारचे दु:ख संपविण्याची ताकद गणेश मंडळांमध्ये असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

