पुणे : कोकणात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. सध्या पूरस्थिती ओसरली असली, तरी या महापुराने काय हिरावून घेतले आहे, हे येथील भयानक परिस्थिती पाहिल्यावर दिसून येते. या परिस्थितीत आपल्या बांधवांना सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, नुकतेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाड तालुक्यातील पूरग्रस्त भागात मदतकार्य व श्रमदान करण्यात आले. या कठीणसमयी कोकणवासीयांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आले असले, तरी आणखी मदतीची अपेक्षा आहे. तरी, पुणेकरांनी आपापल्यापरीने मदतकार्यात सहभाग द्यावा, असे आवाहन मी करीत आहे.अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .
या पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे कि,’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य व श्रमदान करण्यात येत आहे. या कठीणसमयी पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. या कर्तव्यापोटी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाड तालुक्यातील कुंभेशिवथर घळ, कसबे शिवथर व आंबे शिवथर या गावांत अन्नधान्य, कपडे, भाजीपाला व औषधे अशा आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, साहित्य संकलन केंद्राकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. तसेच, राजेवाडी गावात श्रमदानाच्या माध्यमातून गावाची सफाई करण्यात आली व जंतूनाशक पावडर फवारण्यात आले.

राजेवाडीतील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आवश्यकता व स्वच्छतेसाठी म्हणून पुढील आठवड्यात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे टँकर, जेसीबी, जेटिंग मशीन, सॅनिटायझर आणि आवश्यक औषधे पाठविण्यात येणार आहेत. त्यातून निश्चितच राजेवाडी गावाला संकटातून बाहेर काढणे शक्य होणार आहे.
सध्या राजेवाडी गावातील परिस्थिती पाहिल्यास मन सुन्न होते. हा परिसर जवळपास १४ फूट पाण्याखाली होता. सर्वत्र चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य आहे. होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी आणि परिसराला रोगराईमुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न व मदत करण्यात येत आहे. परंतु, त्यालाही निश्चितच काही मर्यादा आहेत. हे घटनास्थळी भेट दिल्यानंतर कुणाच्याही लक्षात येईल. तरी, पुणेकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपापल्यापरीने मदतकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून करीत आहे.
आतापर्यंत केवळ राज्यातच नव्हे, तर देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत आपल्या बांधवांना आधार देण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या कोकणातील बांधवांसाठीही पुणेकरांनी आपापल्या परीने निश्चितच योगदान दिले आहे. त्याबद्दलही मी समस्त पुणेकरांचे आभार व्यक्त करतो.

