मुंबई : सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांनी गुंडगिरीचं समर्थन करणं हे लोकशाहीचं अध:पतन आहे. सेनाभवनबाहेर राडा केलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. हे लोकशाहीला शोभणारे नाही त्यामुळे राज्यात शिवशाहीचे राज्य आहे की गुंडशाहीचे राज्य? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी या संदर्भात बोलत असताना शिवसेनाभवनाबाहेर राडा घातलेल्या शिवसैनिकांचे कौतुक केले त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राडा केलेल्या शिवसैनिकांचे कौतुक करतात हे लोकशाहीला शोभणार नाही आहे. एका बाजुला सत्ताधारी बोलतात कायदा आणि सुव्यवस्था राखणे आपलं काम आहे हे बोलताना दुसऱ्या बाजुला झालेल्या राड्याचे कौतुक करत आहे. त्यामुळे हे राज्य नेमंक शिवशाहीचे की गुंडशाहीचं? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
पंढरपुरच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव सहन करावा लागला. या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, पंढरपूरच्या पराभवानंतर भाजपचा वाढता आलेख रोखण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. मतदारसंघ छोटे केले तर अमिष देता येईल, धाकदपटशाही, या जोरावर निवडणूक जिंकता येईल यासाठी प्रभाग रचना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही याच्या संभ्रमात आहेत, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा त्यांचा उमेदवार ठरत नाही. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नाही आणि समन्वयाचा अभाव आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
शिवशाहीचे राज्य आहे की गुंडशाहीचे-प्रविण दरेकर यांची शिवसेनेवर टिका
Date:

