पुणे – पाषाण गाव आज शहराच्या सीमेवर राहिलेले नाही. तसेच या परिसराचे चित्रही अधुनिकतेकडे चालले आहे. अशा वेळी पाषाण गावात मूलभूत सुविधा दिसत असल्या तरी त्याचा योग्य उपयोग ग्रामस्थांना होताना दिसत नाही. त्यामुळे पाषाण गावात म्हणजे सर्व्हे नंबर एक परिसरात सीमेंटचे रस्ते, गटारे, यासारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने व चांगल्या दर्जाच्या देऊ असे चंद्रशेखर तथा सनी निम्हण यांनी आज येथे सांगितले.
पाषाण – बाणेर – बालेवाडी प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे उमेदवार चंद्रशेखर तथा सनी विनायक निम्हण, संजय निम्हण, रोहिणी धनकुडे आणि नीता रणपिसे यानी पाषाण सर्व्हे नंबर एक परिसरातील मतदारांशी संपर्क साधला आणि त्यांच्या अडचणी समजावून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन देताना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केल. धर्मवीर संभाजी चौकापासून प्रचार फेरी सुरू झाली.
फटाक्यांची आतषबाजी, शिवसेनेचे फडकणारे भगवे झेंडे, जयभवानी जयशिवाजीच्या घोषणा अशा जल्लोषपूर्ण वातावरणात प्रचार फेरी सुरू झाली. पाषाणचे भगवान तुकारम निम्हण, निलेश मधुकर निम्हण आणि त्यांच्या मोठ्य़ा संख्येने असलेल्या उत्साही कार्यकर्त्यांनी प्रचार फेरीचे नियोजन केले होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी उत्साहत उमेदवारांचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केले. पाषाण सर्व्हे नंबर एक, निम्हण मळा, विवेकानंद सोसायटी, लोंढे वस्ती अशी ही प्रचार फेरीची सांगता निम्हण मळा येथे झाली. सनी येळवंडे, संतोष निम्हण, सचिन निम्हण, राजेंद्र निम्हण, राम निम्हण, तानाजी निम्हण आदी या प्रचार फेरी सहभागी झाले होते.
दरम्यान, काल संध्याकाळी सुतारवाडीतील बहिरोबाच्या मंदिरात नारळ वाढवून त्यांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. मतदारांशी बोलून त्यांचे आशिर्वाद उमेदवार घेत होते. अनेक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना महिलांनी शुभेच्छा दिल्या. या प्रचार फेरीची सांगता शिवसेनेच्या कचेरीशी झाली. या प्रचार फेरीच्या निमित्ताने सुतारवाडीत शिवसेनामय झाली होती. यावेळी त्यांच्या बरोबर स्थानिक कार्यकर्ते आणि महिलाही होत्या. त्यात गोविंद रणपिसे, शामदादा रणपिसे, वाडेश्वर सुतार, रेखाताई सुतार, मुक्ताताई दांगट, अमीत रणपिसे आदींचा समावेश होता.