मुंबई- एकीकडे भाजपचे नेते अद्यापही आम्ही सेनेशी युती करण्यास तयार असल्याचे दर्शवित असले तरी दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतून शिवसेनेलाच हद्दपार करण्याची चाणक्यनीति आखली जात असल्याचे बोलले जाते आहे . अर्थात ही नीती गेल्या काही वर्षांपासून आखली जाते आहे . मात्र आता ती उघडस्वरूपात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही . पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार नाही असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे ,पण याचा अर्थ ती महाराष्ट्रीयन मराठी माणसांच्याच अधिपत्याखाली राहील असे मात्र नाही . याची नोंद सामिक्षकांमध्ये घेतली जावू लागली आहे . कारण जर भाजपला मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणे भाग पडले तर मुंबईत नरेंद्र मोदींची सभा हमखास होणार असे येथे ठामपणे सांगितले जाते आहे .
दरम्यान प्रचाराची नीती आणि पद्धती भाजपने तयार देखील ठेवली आहे, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची सोशल मिडीयावर कशी व्यंगचित्रे धपाधप देशभर फिरत होती , आठवतेय ? लोकसभा निवडणुकीपूर्वी पद्धतशीर पणे कॉंग्रेसला सोशल मिडियातून बदनाम करण्यात आले . कॉंग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची किंमत त्यांना निवडणुकीत मोजावी लागली .आणि ‘अच्छे दिन ‘ दाखवणाऱ्यांचा देशभर झेंडा फडफडला . आता हीच नीती मुंबईतून शिवसेनेला हद्दपार करण्यासाठी भाजप वापरत आहे काय ? असादेखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे . त्याला कारण देखील तसेच घडले आहे .
‘ टॅक्सपेयर मुंबईकर ‘ या नावाने रोज मुंबईतील मतदारांना ईमेल पाठविले जात आहेत . ज्याद्वारे फोटो कम व्यंगचित्रे पाठवून छुपा प्रचार सुरु झाला आहे असे सांगण्यात येते . नेमके हे कोण करत आहे हे गुलदस्त्यात मात्र आहेच . .. तुंबलेली मुंबई, बकाल झोपडपट्ट्या … दाखवून ‘आम्ही हे करून दाखविले ‘ अशी मागील निवडणुकीतील सेनेची घोषवाक्ये त्याबरोबर चिटकवली जात आहेत.
जर सेनेने आपला जवळचा मित्र आता कट्टर शत्रूच करायचा ठरविला असेल तर .. त्यांनी धाडकन निर्णय घेवून विधानसभा आणि लोकसभेतील सरकारचा पाठींबा काढून घेवून महापालिका निवडणूक लढवावी आणि पुन्हा निवडणूक झाल्यावर काहीही परिस्थिती असली तरी भाजपसमवेत जाणार नाही .. अशीच टोकाची आणि ठाम भूमिका घेऊन सामुहिक जाहीर शपथ घ्यावी .. तरच मुंबई तील घसरलेला का होईनात मराठी टक्का त्यांच्या पाठीशी राहू शकेल . असे जाणकारांचे मत आहे . अन्यथा मुंबई तील बिगरमराठा आता भाजपच्या झेंड्याखाली एकवटतो आहे . आणि मराठी मताचे मात्र विभाजन होते आहे . असा दावा करण्यात येतो आहे . भाजपला एकाकी पाडण्यासाठी अन्य समविचारी पक्षांची शिवसेना मदत घेवू शकते असे काहींचे म्हणणे आहे . या पार्श्वभूमीवरर वेगवेगळ्या चर्चा आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी येथे युती होईल काय ? मनसे आणि शिवसेना अशी युती होईल काय ? अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर सध्या खल होतो आहे .