पुणे : शिवसेना पुणे शहरप्रमुखपदी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर यांची नेमणूक आज करण्यात आली. मोकाटे यांच्याकडे कोथरुड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती तर बाबर यांच्याकडे हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगांवशेरी, खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन शहरप्रमुखांबरोबरच नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, संजय मोरे व किरण साळी यांच्याकडे उपशहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
युवासेनेचे शहरप्रमुख असलेल्या साळी यांच्याकडे उपशहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना वडगावशेरी मतदारसंघ वडगावशेरी विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष पदी नगरसेवक संजय भोसले यांची निवडकरण्यात आली
पाचजणांच्या टीमबरोबरच प्रशांत बधे, शाम देशपांडे व अजय भोसले या शहर पातळीवरील वरिष्ठांना सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या शिवाय महिला आघाडीला दोन शहरप्रमुख नेमण्यात आले आहेत.सविता मते व नगरसेविका संगिता ठोसर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार व शिवसेना नेते संजय राऊत व पुण्याचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी मुंबईत शिवसेना भवनात आज ही घोषणा केली. माजी आमदार विनायक निम्हण हे जवळपास दोन वर्षे शहरप्रमुख होते. त्यांच्या कार्यकाळातच पुणे महपालिकेची निवडणूक झाली. निम्हण यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून संघटनचे काम थंडावलेले होते.
आधीच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबरच विखुरलेल्या मूळच्या शिवसैनिकांना एकत्र करून शहरात संघटना भक्कम करण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याचे नूतन शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले. शाखा हा शिवसेच्या विस्ताराचा पाया आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व शाखा भक्कम करण्याबरोबरच शाखा विस्ताराचे काम हाती घेण्यात येईल. समाजातील प्रत्येक घटकाला शिवसेनेचा आधार वाटला पाहिजे हा दृष्टीकोन समोर ठेऊन काम करणार असल्याची भावना मोकाटे यांनी व्यक्त केली.