–
; पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीच्या परिश्रमांना अभूतपूर्व यश
पुणे : रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार. त्यामुळे त्यांचे कार्य तरुणाईपर्यंत पोहोचावे, याकरीता महाराष्ट्रातील अकृषी, अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि तत्सम शिक्षण संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिन (दि.६ जून) शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार असल्याचा शासन निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ३ जून २०२१ रोजी काढला आहे. या निर्णयाची पहिली प्रत छत्रपती संभाजी राजे यांना पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समन्वयक किरण साळी यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरुपी सगळ्यांसमोर रहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी, याकरीता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून शिवस्वराज्य दिन साजरा करतील. महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, अशी उदय सामंत यांनी पुण्यामध्ये १९ फेब्रुवारी २०२१ रोजी लालमहालामध्ये शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात घोषणा केली होती. यापूर्वी याच कार्यक्रमात अमित गायकवाड यांनी शिवस्वराज्य दिन सर्वत्र साजरा व्हावा, अशी मागणी केली होती. त्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून यश आले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक किरण साळी यांनी दिली.
उदय सामंत म्हणाले, ज्या वयात तरुणाईच्या जीवनाची दिशा बदलू शकते, अशा वयात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. शिवाजी महाराजांनी भारतीय संस्कृतीचे रक्षण करुन खूप मोठा संघर्ष केला, त्याची माहिती आजच्या तरुणाईला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने होणे गरजेचे आहे. महाविद्यालयांमध्ये हा दिन साजरा झाल्याने परदेशी विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा इतिहास पोहोचणार आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा, हा शासननिर्णय योग्य आहे. शिवराज्याभिषेक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्यादृष्टीने हे पाऊल अत्यंत स्तुुत्य आहे. शिवजयंती महोत्सव समिती व अमित गायकवाड यांच्या अभिनव संकल्पनेतून चांगले काम उभे रहात असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित गायकवाड म्हणाले, दिनांक ६ जून २०१३ रोजी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशकी राजदंडी स्वराज्यगुढी दुर्गर्गेश्वर रायगड येथे उभा करुन शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन संपूर्ण विश्वभर साजरा व्हावा, ही संकल्पना मांडून सलग ९ वर्षे अथक परिश्रम घेतल्याने या संकल्पनेचा वटवृक्ष झाला आहे. हे यश सर्व स्वराज्यबांधवांना समर्पित करीत आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन शासनाने हा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र यामाध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पुण्यातील सीओईपी च्या सभागृहात शिवस्वराज्य दिनाचा पहिला कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
*फोटो ओळ : महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन (दि.६ जून) शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार असल्याचा शासन निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ३ जून २०२१ रोजी काढला आहे. या निर्णयाची पहिली प्रत मुंबई येथे छत्रपती संभाजी राजे यांना पुण्यातील शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समन्वयक किरण साळी यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांनी दिली.

