लसीकरणासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे – कोविडची साथ नियंत्रणात येत असली तरी, शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर बंद करु नये आणि नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, याकरिता प्रशासनाने त्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज(शनिवारी) कोविड साथीच्या आढावा बैठकीत मांडल्या.
कोविड-१९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेले प्रतिबंधात्मक उपाय आणि कार्यवाही याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत आमदार शिरोळे यांनी कोविड साथीच्या दृष्टीने सूचना केल्या. पुणे शहरात कोविडची साथ नियंत्रणात येत आहे. परंतु, ग्रामीण भागात अद्यापही साथीचा जोर टिकून आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे. या बाबी लक्षात घेऊन शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर बंद करु नये. पुणे जिल्ह्याच्या बाहेरीलही अनेक रुग्ण येथे उपचारासाठी आणले जातात हा ही मुद्दा लक्षात घ्यायला हवा, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
अद्यापही काही नागरिक कोविड प्रतिबंधक लस टोचून घ्यायला घाबरतात असे आढळून आले आहे. साथ नियंत्रणात आणायची असेल आणि रोगाचे भयानक परिणाम टाळायचे असतील तर, लस घेणे आवश्यक आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रबोधन करणे आवश्यक आहे, अशीही सूचना आमदार शिरोळे यांनी केली.
कोरोना प्रतिबंधक लसीचे एक किंवा दोन डोस घेऊनही ज्यांना या साथीची बाधा झाली आहे आणि या साथीने जे मृत्यूमुखी पडले आहेत अशा नागरिकांची माहिती पुणे महापालिकेने संकलित करावी, शहरात वॉर्डनिहाय लसीकरणाची माहिती जमवून ती प्रसिद्ध करावी. त्यात पहिला डोस घेतलेले किती आणि दोन्ही डोस घेतलेले किती याची वर्गवारी करून ती जाहीर करावी. तसेच, पुण्यात कोविड नियंत्रणासाठी पालकमंत्री, सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांच्या माहितीचे पद्धतशीर जतन (डॉक्युमेंटेशन) केले जावे, असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले.

