मुंबई: बंडखोर आमदार आज गोव्यातून मुंबईत परतले. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून मुंबई विमानतळ ते ओबेरॉय हॉटेल या मार्गिकेवर मुंबई पोलिसांनी विशेष कॉरिडॉर तयार केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. या बंडखोर नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते.या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .आमदार ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर निर्माण करण्यात आला आहे.तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर पडले. मुंबई पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या.
मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करू देत नाहीत. कारच्या क्रमांकाच्या मदतीने ते मालकांशी संपर्क साधून त्यांना कार काढण्यास सांगत आहेत. या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे सर्व कर्मचारी गस्त आणि राऊंडअपवर आहेत. त्यासाठी मुंबईत एअरपोर्ट ते ओबेरॉय हॉटेलपर्यंत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

