मुंबई-पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित अडचणीत सापडले आहेत. गावित यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात त्यांना पालघर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांना हा मोठा दणका बसला आहे. न्यायालयाने सदर दंड आणि शिक्षेला 14 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.
खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोंबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून, त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.

