पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्याविरोधात याचिका; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
मुंबई-केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेने ( आयोगाच्या दृष्टीने ठाकरे गटाने )दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह अत्यंत घाईगडबडीत गोठवण्यात आले, बाजू मांडण्याचीही संधी दिली गेली नाही, अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटाने केली आहे.दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 2 वाजेपर्यंत ठाकरे व शिंदे गटाला कोणते पक्षचिन्ह व नाव द्यायचे, याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे आयोगाविरोधातील आमच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने शिवसेनेचे नाव व चिन्ह गोठवले, त्या प्रक्रियेवरच ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाने म्हटले आहे की, शिवसेना कुणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर सुनावणी घेऊन आयोगाने दोन्ही गटांचे काय म्हणणे आहे, हे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीही न करता अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला देऊन तातडीने चिन्ह गोठवण्यात आले. अंधेरी पोट निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आणखी काही दिवस आहे. तोपर्यंत आयोगाला सुनावणी घेता आली असती.ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला पक्ष चिन्ह गोठवण्याचा अधिकार असला तरी आयोगाने नैसर्गिक न्यायाच्या नियमांचे पालन केले नाही. दरम्यान, ठाकरे गटाने निवडणूक आयोगालाही याबाबाबत खरमरीत पत्र पाठवले आहे. तसेच, शिवसेना खासदार अनिल देसाईदेखील दिल्लीत तळ ठोकून आहेत.
शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. मात्र, आता याचे कारणही समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता उच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करणार का, हे पाहावे लागेल. शिवसेनेच्या याचिकेवर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईत सगळे निर्णय घेतले. या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल, अशी आशा शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार का? सुनावणी झाल्यास हायकोर्ट निवडणूक आयोगाला काय निर्देश देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

