मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजप व पक्षाच्या बंडखोर आमदारांवर कडाडून हल्ला चढवला. ‘सध्या भाजपच्या मदतीने शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या या कटाला शिवसेनेचे काही नेते बळी पडलेत. ते पक्षाचे नाव चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणी माझ्याकडे एखादी गोष्ट मागितली तर मी सर्वकाही देईन. पण कुणी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असे ते म्हणालेत. ते शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होते.
शिवसेनेचे 12 खासदार मंगळवारी बंडखोरांत सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी मंगळवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपल्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली. या घटनेमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंडखोर नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.
जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद
उद्धव यांनी मंगळवारी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यात त्यांनी सध्या शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले -सद्यस्थितीत आपल्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. मला एखादी गोष्ट मागितली तर मी तुम्हाला सर्वकाही देईल. मग माझ्यापुढे गद्दार असू दे किंवा अन्य कुणीही असू दे. त्याने काहीही फरक पडत नाही. पण कुणी माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
महाराष्ट्र पिंजून काढणार
उद्धव यांनी यावेळी आपण लवकरच अवघा महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचेही स्पष्ट केले. शिवसैनिकांनी कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नये. या संकटाकडे त्यांनी एक संधी म्हणून बघावे. मी लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका पिंजून काढेल, असे ते म्हणाले.
शिवसेनेला पराभूत करून दाखवा
राज्यात मध्यावधी निवडणूक घेऊन शिवसेनेला पराभूत करवून दाखवा. दुसऱ्यांचे पक्ष चोरणे, दुसऱ्यांच्या पक्षाचे नाव चोरण्याचा प्रयत्न करणे हे चोराचे काम आहे. सध्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. हा खेळ काही दिवस चालेल. तो त्यांना खेळू द्या, असे उद्धव बंडखोर व भाजपला उद्देशून म्हणाले. आमदार व खासदारांना मलाही डांबून ठेवता आले असते. पण त्याला लोकशाही म्हणत नाहीत. अशा गोष्टींवर माझा विश्वासही नाही. ज्यांना जायचे त्यांनी जावे. नाटक करू नका. रडण्याचे ढोंग करू नका. शिवसेना तुम्हाला चांगलीच ओळखते, असेही ते यावेळी म्हणाले.
शिवसेनेची सदस्य नोंदणी जोमात
आज दिवसभरात अडीच हजार नव्हे तर 5 हजार नव्या सदस्यांची नोंदणी झाल्याचे मला सांगण्यात आले. मी संबंधितांना अधिकाधिक नोंदणी करण्याचे आदेश दिलेत. आज शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या डावाला बळी पडून घाव घालणे सुरू आहे. ज्यांना मी आपले मानत होतो तेच आता सूडाने पेटलेत. त्यांना भाजपची फूस आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना म्हणाले.

