मुंबई-एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी देऊनही त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही, असा गंभीर आरोप आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेत राज्याचे माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली.दादा भुसे म्हणाले, ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून धमकी येताच त्यांच्या सुरक्षेबाबतचा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. मात्र यावर चर्चाच करण्यात आली नाही. शिवसेना वाढवण्यासाठी अनेकांनी जिवाचे राण केले. त्यामुळे शिवसेना उभी राहिली. मात्र अशा कट्टर शिवसैनिकांकडेच दुर्लक्ष करण्यात आले.
आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्ही अपात्र ठरु शकत नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु करत शिंदे गटावर टिकेची झोड उठवली आहे. त्याला केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी
केसरकर म्हणाले, शिवसेनेत आमदारांनी केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, आता कट्टर शिवसैनिकांचा अपमान करण्यात येत आहे. त्यांना गद्दार म्हटले जात आहे. कट्टर शिवसैनिकांमुळेच शिवसेना ताठ मानेने उभी आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा अपमान करू नका. शिवसैनिक दूर गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी यात्रा सुरू केल्या आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. आम्ही आदराने बोलतो. तुम्हीदेखील आदाराने बोला.
धमकी देऊ नका
आम्ही तुमच्यामुळे निवडून येत नाही. त्यामुळे आम्हाला निवडणुकीची धमकी देऊ नका, असा इशाराच केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. केसरकर म्हणाले, आमचे सर्व आमदार हे शिवसेनेच्या नव्हे तर स्वत:च्या ताकदीवर निवडून येतात. त्यामुळे आमचा अपमान करुन लोकांना भावनिक आवाहन करणे थांबवा. अन्यथा आमच्या मतदारसंघातील जनता तुमच्याविरोधात पेटून उठेल. शिंदे गटावरील आमदारांवर अन्याय हा त्यांच्या मतदारसंघातील जनतेवरही अन्याय आहे.
खरे शिवसैनिक कोण
आदित्य ठाकरेंना खरे शिवसैनिक कोण हे तरी माहिती आहे का, असा सवाल दिपक केसरकर यांनी केला. तसेच, आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील शिवसैनिक म्हणतील, अशी खिल्ली केसरकरांनी उडवली. केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंनी कधीच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या नाहीत. मात्र आता आदित्य ठाकरे यात्रा काढत आहेत. यापूर्वी मविआची प्रशंसा करण्यात त्यांनी वेळ घालवल्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. मात्र, आमच्यातही शिवसेनेचे रक्त आहे. आमच्या आमदारांना काही बोलाल तर सर्व पेटून उठतील.

