मुंबई-
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नव्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधून कांजूरमार्गला नेलेले कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून पर्यावरणवाद्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी त्यावरून राज्य सरकारला विंनती केली आहे.

अमित ठाकरे यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे. आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. नाहीतर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्टमध्ये काय?
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण – तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.
आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती.

