नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तसेच दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांचे निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होत्या. दिल्लीतील एस्कॉर्ट हॉल्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने दिल्लीतील नेतृत्व हरपले अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
उपचार सुरू असताना आला हृदयविकाराचा आणखी एक झटका
एस्कॉर्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला दीक्षित यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना वाचवण्याचा डॉक्टरांनी पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी 3:15 वाजता त्यांना आणखी एक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वेळीच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि 3.55 वाजता त्यांचे निधन झाले.
15 वर्षे भूषविले दिल्लीचे मुख्यमंत्रीपद
शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 रोजी पंजाबच्या कपूरथला येथे झाला होता. त्यांनी तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले. 1998 ते 2013 पर्यंत मुख्यमंत्री राहिल्यानंतर 2014 मध्ये त्यांची केरळच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांनी 25 ऑगस्ट 2014 रोजीच राज्यपाल पदाचा राजीनामा देखील दिली. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या उत्तर-पूर्व दिल्लीतून काँग्रेसच्या उमेदवार होत्या. परंतु, या जागी भाजपचे नेते आणि भोजपुरी कलाकार मनोज तिवारी यांचा विजय झाला. शीला दीक्षित 1984 ते 1989 पर्यंत कनोज येथून लोकसभा सदस्य होत्या. सोबतच, 1986 ते 1989 पर्यंत त्या केंद्रात मंत्री देखील होत्या. मनोज तिवारी यांनी देखील शीला दीक्षित यांच्या निधनावर भावूक प्रतिक्रिया दिली. नुकतेच त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आपले स्वागत एका आईप्रमाणे केले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नाही, हा आपल्यासाठी आणि एकूणच दिल्लीसाठी मोठा धक्का असल्याचे मनोज तिवारी म्हणाले आहेत.

