पुणे : भारतात वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी असं चित्र दिसत असल्याचं सांगत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली. बदल होणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व बाळगाल तर उद्ध्वस्त व्हाल, असा इशाराही त्यांनी दिला. तर कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. रिझर्व्ह बँक, नोटाबंदीचा निर्णय, रघुराम राजन यांचा राजीनामा या सर्वच मुद्यांवरुन त्यांनी मोदींवर तोफ डागली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अवमूल्यन केलं. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन हेराफेरी केली,’ असा थेट आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणउपस्थित होते.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले ,’मी भारतीय जनता पक्षाआधी भारतीय जनतेचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर चांगले लोक राजकारणात यायला तयार नसतील तर त्यांना वाईट प्रशासनाच्या राज्यात जगावं लागतं. त्यामुळेच मी राजकारणात आलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपने आधीच नोटबंदी करून लोकांना कडुनिंबाची चव चाखायला लावली आता तर त्यावर कारले चढवून जीएसटीसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीची भेट दिला उच्चार त्यांनी केला.लोक पंतप्रधानांना भेटू शकत नसले तरी आम्हाला मात्र निवडणुकीची आश्वासने कुठे गेली असा प्रश्न विचारत असल्याचा अनुभव सांगितला.राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले, इथे हमीभाव मिळत नाही तर अधिक दर तर लांब आहेत असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या राजीनाम्यावरुन केतकर यांनी यावेळी मोदींवर तोंडसुख घेतलं. ‘ज्या रघुराम राजन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्यास भाग पाडलं ते आता बँक ऑफ इंग्लडचे प्रमुख होऊ शकतात,’ असा दाखला केतकर यांनी दिला. ‘मोदींनी स्वतंत्र दहशत यंत्रणा तयार केली आहे. काही दिवसांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मागे टाकतील. त्यांच्यात आणि संघात दहशतीची स्पर्धा सुरू आहे,’ असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत मोदी स्वतः घेतलेल्या निर्णयांची पानं पत्त्यासारखी मंत्र्यांच्या हाती देतात. भारताला असा खोटारडा पंतप्रधान भविष्यात कधीही मिळू नये, असंही केतकर यांनी म्हटलं.

