पुणे – देशाने विज्ञान व तंत्रज्ञानात केलेल्या प्रचंड प्रगतीमुळेच आपण आज जगात काय चालले आहे ते सहजपणे जाणून घेण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन आपल्यामध्ये आला आहे. हाच वैज्ञानिक दृष्टीकोन आपण आपल्या रोजच्या जीवनात उपयोगात आणणे आवश्यक आहे. सामाजिक सुधारणांसाठी प्रत्येकाच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजण्याची गरज आहे असे परखड मत एआरडीएच्या असोसिएट डायरेक्टर सुचित्रा अवचट यांनी आज येथे व्यक्त केले.
शक्ती या महिलांच्या राष्ट्रीय संघटनेच्या स्थापना दिना निमित्ताने महाराष्ट्राच्या शारदा शक्ती या महिला संघटनाच्यावतीने आय़ोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात “वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सामाजिक भान” या विषयावर सुचित्रा अवचट बोलत होत्या. यावेळी शारदा शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लिना बावडेकर, शारदा शक्तीच्या अध्यक्षा डॉ. राजश्री कशाळकर उपस्थित होत्या. यावेळी ज्ञानप्रबोधिनीच्या नागरी वस्त्ती मार्गदर्शन व सल्ला केंद्राच्या हर्षाताई किर्वे यांना “शक्ती प्रेरणा” आणि अपंग असूनही जिद्दीने शिक्षण घेणारी राजश्री संघाटी हिला “आय – शक्ती सपोर्ट” हे पुरस्कार अवचट यांनी प्रदान केले.
सुचित्रा अवचट पुढे म्हणाल्या, मी संशोधन क्षेत्रात उच्च विद्या विभूषित लोकांच्या बरोबर काम करते. त्यांच्याबरोबर काम करताना आपण जर प्रत्येक गोष्टीचा शास्त्रीय पध्दतीने विचार केला तर कोणतिही क्लिष्ट वाटणारी गोष्टी आपण सहज सोडवू शकतो हा माझा अनुभव आहे. आपल्याकडे दुर्दैवाने महत्व नसलेल्या गोष्टींचे जास्त अवडंबर माजवले जाते अन शेवटी त्यातून काहीच साध्य झालेले दिसत नाही. जसे शनिच्या चौथ-यावर कोणी जायचे यासारख्या प्रश्नांना अवास्तव महत्व सगळेच देताता. पण तेथे गेल्या अन न गेल्याने काय फरक पडणार आहे याचा विचार कोणीच करत नाही.
सुदैवाने आपल्या राजघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रिय विचारांना मोठे स्थान दिले आहे असे सांगून त्या म्हणाल्या, कचरा किंवा पाणी टंचाई किंवा प्रदूषण यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी सामाजिक भान येणे आवश्यक आहे. त्यामुळे या समस्यांचा प्रत्येकाने शास्त्रिय दृष्टीकोनातून विचार करणेच आवश्यक आहे पण तेच काम आपण करत नाही. ज्या देवळांसमोर लांब दर्शनासाठी रांगा असतात अशा देवळात आपल्याला आत्मशांती खरच मिळेल का ? यासारख्या गोष्टींचाही आपण विचार न करता रांगेत उभे राहून वेळ घालवतो. या सारख्या गोष्टींबाबत आपण शास्त्रिय सत्याचा स्वीकार करून त्या इतरांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. ते सामाजिक भान प्रत्येकामध्ये येण्यासाठीच प्रत्येक गोष्टीकडे शास्त्रिय दृष्टीकोनातून बघण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या भाषणात हर्षा किर्वे यांना सांगितले की, विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपल्या शहरात इमारती अनेक वस्त्यांमध्ये पोचल्या पण त्या इमारतीत रहाणा-या कुटुंबातील म्हणजेच घरातील वातावरण मात्र बदललेले नाही असेच चित्र सगळीकडे आहे. कुटुंबातील वातावरणात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असल्यानेच त्यांच्या समाजिक समस्या सुटलेल्या दिसत नाहीत. राजश्री संघाटी हिने सांगितले की, मला मित्राने दिलेल्या धीरामुळेच आपण कोणतिही गोष्ट करू शकतो असा आत्मविश्वास आला. मी वडीलांना सांगितले की इतके दिवस तुम्ही घर चालवत होतात पुढे मी आख्ख घर चालवेन. मला सीए व्हायचे होते पण आज जाणवते की आपण सीए केले नाही ते बरंच झालं कारण दुस-याच्या उपयोगी पडण्याचे भान राहिले नसते. ते भान डीएडच्या शिक्षणामुळे मला मिळाले आहे.
स्वागतपर भाषणात शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लीना बावडेकर यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी शारदा शक्ती हे संघटन सन 2003पासून सध्या 9 राज्यात कार्यरत आहे. महाराष्ट्रात पुण्यासह नाशिक, औरंगाबाद सारख्या काही शहरात सुरू आहे. लवकरच देशातील सर्व राज्यात शक्तीचे काम सुरू करण्याची योजना तयार होत असून येत्या काही वर्षात देशभर शक्तीचे काम सुरू झालेले बघायला मिळेल. यावेळी शक्तीच्या कार्याच्या महितीचे सादरीकरण डॉ. सुनंदा पेढेकर यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. डॉ. अरूणा चाफेकर यांनी शक्तीगीत सादर केले. डॉ. मनिषा खळदकर यांनी पुरस्कारार्थींचा तर पाहुण्यांचा परिचय प्रिय हेर्लेकर यांनी करून दिला. शारदा शक्तीच्या डॉ. राजश्री कशाळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि शेवटी आभार प्रदर्शन केले.