मुंबई-जे-जे भाजपच्या विरोधात बोलतात. त्यांच्यावर राज्यातच नव्हे तर देश पातळीवर देखील ईडीचा धाक दाखवून कारवाई केली जाते. नवाब मलिकांवर कारवाई केली जाईल याची कल्पनाही नव्हती. नवाब मलिक हे विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
ईडीने मलिकांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कधीना-कधी हे होणारच होते. हे काही नवीन नाही. मलिकांवर कारवाई होईल याची कल्पनाही मला नव्हती. मलिक हे गेल्या काही दिवसांपासून, विरोधात बोलत असल्याने त्यांचा आवाज बंद करण्यासाठी मुद्दामुन ही कारवाई करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले.“काही झालं तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असंच वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला आता २५ वर्ष झाली. पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात तसंच विरोधात वापरल्या जाणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात जे भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.

