मुंबई–लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
‘रावसाहेब दानवेंचा नवीन गूण मला कळाला’
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी परत भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. पण त्यांचा हा गूण मला माहिती नव्हता. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसे सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही,’ असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला.
‘केंद्राकडून सत्तेचा गैरवापर’
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ‘दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचा प्रश्न सोडवण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे,’ असे म्हणत सरनाईक यांच्यावरील कारवाईचा पवारांनी निषेध केला.
‘दिल्लीत वेगळे राज्य असेल तर राज्य चालवणे कठीण असते. लोकांची कामे करत असताना मदत करण्याऐवजी केंद्र सरकार विरोधी पक्षाला नाउमेद करत आहे. त्याचे उदाहरण आज पाहण्यास मिळाले आहे. आज जे सरकार चालू आहे, त्याला सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नैराश्यपणा भाजप नेत्यांमध्ये आला आहे, त्याचे हे प्रतिक आहे’, असा टोला पवारांनी भाजपला लगावला.

