मुंबई – भुजबळ यांच्यावरील कारवाईमुळे पक्षाच्या प्रतिमेचा हानी पोहोचते का, आणि त्यावर तुम्ही आंदोलन करणार का, असा प्रश्न विचारला गेल्यावर शरद पवार यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, “यापेक्षा अधिक गंभीर प्रश्न महाराष्ट्रापुढे आहेत. लातूरसारख्या ठिकाणी २० दिवसांतून एकदाच पाणी येतं. जून महिन्यापर्यंत कसा टिकाव धरायचा लोकांनी? या संकटग्रस्त लोकांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझे अपील आहे की, सरकार सुडाने वागतंय त्याची चिंता करू नका, आपले अधिकार, संघटन तसेच केंद्रातील मदत यांचा समन्वय साधून या दुष्काळाचा सामना कसा करता येईल त्याचा विचार करा. दुष्काळग्रस्त शेतकरी, गुरांच्या छावण्या तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाऊ नये यासाठी पूर्ण जोमाने मदत करण्याची आवश्यकता आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील प्रदेश कार्यालय राष्ट्रवादी भवन येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मनमोकळी चर्चा केली. “सांगायचं एवढंच होतं की मी हयात आहे…” असं मिश्किलपणे सांगत श्री. पवार यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यासंबंधीच्या वदंतांना चोख उत्तर दिलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा उसळला.
अर्थात या वार्तालापात पत्रकारांच्या प्रश्नांचा अधिकतर रोख अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईसंबंधात होता. या प्रश्नांना श्री. पवार यांनी कोणतीही आडकाठी न ठेवता मनमोकळी उत्तरं दिली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
“तपासकार्य करणाऱ्या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची माझी व माझ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. मात्र तक्रार करणारे सत्ताधारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. आणि केवळ तक्रार करून ते थांबत नाहीत तर त्यापुढचे अधिकारही आपल्याला प्राप्त झाल्याच्या आविर्भावात ते विधाने करत आहेत आणि या विधानांच्या माध्यमांतून ते चौकशी यंत्रणांवर दबाव टाकत आहेत.
चौकशी करणाऱ्या यंत्रणा एकाच व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबियांना टारगेट करून त्यांच्या घरांवर, कार्यालयांवर धाडी टाकून एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीन-तीन वेळा कारवाई करत आहेत. महाराष्ट्राने असे कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे पोलिटिकल व्हिण्डिक्टिव्हनेस यामागे आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. अशाप्रकारे सत्तेचा वापर करण्याची पद्धत मी तरी माझ्या राजकीय कारकीर्दीत याआधीच्या विरोधी सरकारांमध्येही पाहिली नव्हती. हा नवीन पायंडा हे सरकार पाडत आहे.” या शब्दांत पवार यांनी या कारवाईची निर्भत्सना केली.
ते पुढे म्हणाले, “भारत सरकारमध्ये असताना मी ग्रुप ऑफ मिनिस्टर्समध्ये अनेक विषय हाताळले होते. ग्रुप ऑफ मिनिस्टर्सना कॅबिनेट पॉवर्स असतात. तशाच पद्धतीने राज्य सरकारच्या पातळीवर मंत्रिमंडळाच्या समितीला पॉवर्स असतात. भुजबळांनी घेतलेले निर्णय हे त्यांचे वैयक्तिक निर्णय नसून कॅबिनेटच्या सबकमिटीचे होते.”
पत्रकारांकडून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईसंबंधात विचारणा झाली व याला सत्ताधारी पक्षाकडून हरॅसमेण्ट म्हणता येईल का, अशा प्रकारे निर्देशित प्रश्नही आले. यावर पवार उत्तरले, “एका एजन्सीने अशोक चव्हाण यांना क्लिन चिट दिली. त्यावर मग दुसऱ्या एका एजन्सीची नेमणूक केली गेली. म्हणजे आपल्याला हवा तसा निकाल येत नाही तोपर्यंत चौकशी सुरू ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सत्तेचा असा उपयोग कधी पाहिला नाही.”

