मुंबई – सत्तेचा दुरुपयोग करून भुजबळांना त्रास देण्याचे कटकारस्थान राबविले जात असल्याचा आरोप करीत भुजबळ निर्दोष असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी येथे केला .
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचे फास ईडीने पुन्हा एकदा आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रथम जून महिन्यात ईडी व एसीबीने छापे टाकल्यानंतर काल सोमवारी पुन्हा एकदा ईडीने छापे टाकले. तसेच भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर यांची उलटतपासणी केली. या तपासणीनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली. याचे पडसाद उमटले. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असून भुजबळांना टार्गेट केले जात आहे अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. यानंतर आज दुपारी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारच्या व त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. पवारांचा रोख अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार किरीट सोमय्या यांच्यावर होता.
भुजबळ यांनीही महाराष्ट्र सदन प्रकरणात वैयक्तिक एकही निर्णय घेतलेला नाही. सर्व निर्णय कॅबिनेटने घेतले आहेत. अशा स्थितीत भुजबळांना दोषी कसे ठरवता येईल. मात्र, ज्या नेत्यांनी ही तक्रार केली तो नेता संसदेत आहे. या नेत्याच्या विचाराचे व पक्षाचे सरकार केंद्रासह राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळा वास येत असल्याचे लक्षात येते. सत्तेचा एवढा दुरुपयोग आपण यापूर्वी कधीही पाहिला नाही. भुजबळांना व त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, ते निर्दोष आहेत.त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मात्र, तपास यंत्रणांना संबंधितांनी तपासात सहकार्य करावे असे पवारांनी भुजबळ कुटुंबियांना आवाहन केले.
शरद पवार म्हणाले, मी राज्यात, केंद्रात अनेक वर्षे काम केले. एखादा निर्णय मंत्रिमंडळाने किंवा ग्रुप ऑफ मिनिस्टर्स यांनी घेतला की त्याबाबत कधीही शंका व्यक्त केली जात नाही असा संकेत आहे. कारण असे निर्णय सामूहिकरित्या व व्यापक हित लक्षात घेऊन घेतले जातात

