मुंबई-‘राहुल गांधी यांच्याकडे देश चालवण्यासाठी लागणाऱ्या सातत्याची कमतरता आहे’, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. पण, राहुल गांधी यांना समजून घेण्यात पवार कमी पडले’, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
माध्यमांशी संवाध साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचे नेतृत्व पक्षाने स्विकारले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतोय. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे वाटते.’
पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही थोरात म्हणाले. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी…महाराष्ट्रातलं सरकार टीकवायचं असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करणं टाळा असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधली ही धुसफूस किती काळ चालते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

