पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात ३० वर्षांनंतर दाखल झाले. मात्र, मांसाहार केल्याने बाहेरून दर्शन घेऊन पवार मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात आले.
गणरायाचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी भिडे वाड्यालाही खालूनच भेट देऊन पाहणी केली. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी ते नास्तिक असल्याची टीका केली होती. त्याचप्रमाणे ब्राह्मण संघटनांनी “पवार इफ्तार पार्टी करतात. मात्र, मंदिरात जात नाहीत,’ असाही आरोप केला गेला होता. पवार शुक्रवारी दुपारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास भेट देणार असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. अनेक वर्षांनंतर पवार शुक्रवारी मंदिर परिसरात दाखल झाल्याने त्यांचे दगडूशेठ ट्रस्टतर्फे मंदिराच्या दारातच स्वागत करण्यात आले. मात्र, आपण मांसाहार केल्याने मुखदर्शन घेतल्याचे सांगत ते पुढील कार्यक्रमास मार्गस्थ झाले.
प्रशांत जगताप म्हणाले, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला मंदिरामागील जागा पाहिजे आहे. त्या दृष्टीने त्यांनी गृहमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केल्याचे आहे. ही बाब गृहमंत्र्यांनी पवारांना सांगितल्यानंतर तेही गृहमंत्र्यांसोबत जागेची पाहणी करण्यास आले होते. दरम्यान, पवार यांच्या दर्शनावरून दिवसभर एकच चर्चा सुरू होती.